JNMS, | Sansthan - Wari Uttasav Events
-- संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन --
जगदगुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम या पीठामध्ये गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगदगुरू रामानंदाचार्य जयंती असा माघ वद्य षष्ठी ते सप्तमी असा उत्सव सोहळा संपन्न होत असतो. संतश्रेष्ठ गजानन महाराज हे जगदगुरूं रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे उपास्य दैवत. संतशिरोमणी गजानन महाराज सन १८७८ माद्य वद्य सप्तमी शके .... या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या गावी पातूरकरांच्या कार्यक्रमप्रसंगी प्रथम दिसले. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. पूज्य श्री गजानन महाराज यांचे सर्व भक्त प्रकटदिन हा सोहळा मोठ्या उत्साहाने, भक्तीभावाने संपन्न करतात. जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांनी नाणीज पीठाची पीठदेवता म्हणून संत शिरोमणी गजानन महाराजांची स्थापना केलेली असल्याने नाणीजधाम या ठिकाणी हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. प. पू. नरेंद्राचार्य स्वामीजी ज्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रतिष्ठीत आहेत, त्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा जन्म माघ वद्य सप्तमी सन १३०० मध्ये झाला. त्यामुळे माघ वद्य सप्तमी या दिवशी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य जयंती साजरी केली जाते. या दोन्हीही विभुतींचा जन्मोत्सव माघ महिन्यामध्ये कृष्ण षष्ठीपासून अष्टमीपर्यंत नाणीजधाम या ठिकाणी संपन्न होतो. या निमित्ताने जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त, शिष्य आणि संपूर्ण स्व-स्वरुप संप्रदायाचा परिवार या कार्यक्रमाला उपस्थित असतो. नाथांचा माहेर हा स्वामीजींचा मूळ आश्रम आहे. या आश्रमातून श्री गजानन महाराज आणि आद्य जगदगुरू रामानंदाचार्य यांची पालखी हत्ती, घोडे तसेच दिंड्या-पताकांच्या जयघोषात नवीन आश्रमी येते. संपूर्ण भारतातील अनेक साधु-संत या कार्यक्रमाला उपस्थित असतात. पूर्णत: तिनही दिवस अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतीक वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो. या सोहळ्यात आपल्या संस्कृतीचे विहंगम दृष्य आपणास अनुभवण्यास मिळते. श्रद्धा, भक्ती, समरसता, द्वैत-अद्वैत यांच्या पलीकडे पोहचलेला प्रचंड जनसमुदाय मन:शांती, आनंद याची लयलूट करताना पाहीला की अत्यंत समाधान वाटते. अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक आणि मन:शांती, आरोग्य या सर्व गोष्टींचा सुंदर मिलाप या कार्यक्रमात पहावयास मिळतो.
-- श्री रामनवमी उत्सव --
देवतांची दैत्यांच्या कचाट्यातुन सुटका करण्यासाठी भगवान विष्णू मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये रघुकूळात अयोध्या या ठिकाणी जन्म घेतात. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. संपूर्ण भारतवासीय हा दिवस स्मरणात ठेवतात. आदर्श पितृभक्त, आदर्श बंधु, आदर्श देव, आदर्श पती आणि आदर्श राजा म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांची ख्याती आहे. एक वचनी, एक वाणी आणि एक पत्नी असे व्रत अंगी असलेल्या भगवान रामचंद्रांचा हा जन्म दिवस. नाणीजधाम या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांचे टुमदार व सुंदर असे मंदीर असल्याने नाणीजधाम या ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. हिंदूधर्मामध्ये आलेली उदासीनता आणि हिंदूधर्मावर झालेली आक्रमणे यामुळे खिळखिळा झालेला हिंदूधर्म पुन्हा चैतन्यमय करण्याकरिता आणि गतवैभव मिळवून देण्याकरीता स्वत: प्रभु रामचंद्रांनी आद्य जगदगुरू रामानंदाचार्य यांच्या रूपाने अवतार घेतला. अनंतानंद, सुखानंद, सुरासुरानंद, नरहरियानंद, योगानंद (ब्राम्हण), पिपा (क्षत्रिय), संत कबीर (जुलाहा), सेना (न्हावी), धन्ना (जाट), रविदास (चांभार), पद्मावती, सुरसरी (स्त्रिया) अशा द्वादश अधिकारी शिष्याकरवी स्वत: हिंदू धर्माची पताका मोठया डौलाने फडकत ठेवण्याचे कार्य आद्य जगदगुरू रामानंदाचार्यांनी केले.शैव वैष्णवांमधील कटुता दूर करून द्वैत-अद्वैतांचा वाद नाहीसा केला आणि हिंदूधर्मात ऐक्य पुन्हा निर्माण करून हिंदूधर्माला संजीवनी देण्याचे काम आद्य जगदगुरू रामानंदाचार्यानी केले. ते एकूण १२७ वर्षे राहीले. या कालावधीत हिंदू धर्मासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी स्पृश्य-अस्पृश्यता नाहीशी केली. जाती भेद विसरून सर्व हिंदू धर्मीय एक आहेत, याची शिकवण दिली. जगदगुरूं रामानंदाचार्य म्हणायचे ‘रामानन्द: स्वयं राम: प्रादुर्भूतो महीतले’ या आद्य जगदगुरू रामानंदाचार्यांचे उत्तराधिकारी म्हणून दक्षिणेकडील विद्यमान जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज असल्याने नाणीजधाम या ठिकाणी हा राम नवमीचा उत्सव तितक्याच आत्मियतेने आणि भक्तीरसात न्हावून निघाल्याप्रमाणे संपन्न होतो. हे पीठ धर्मपीठ असल्याने या ठिकाणी होणारे सर्व उत्सव अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विधीवत साजरे होतात, त्यामुळे याची फलप्राप्ती या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकास प्राप्त होते.
-- गुरूपौर्णिमा उत्सव --
संत श्रेष्ठ नामदेव महाराज असे म्हणतात, ‘ज्यांनी गुरू नाही केला, त्याचा जन्म वाया गेला.' त्या रामकृष्णादी भगवंतांनीही त्या-त्या अवतारात गुरूंचे चरण घट्ट धरले आहे. परमात्मा व जीवात्मा यांच्यामधील दुवा म्हणजे "सदगुरू" होय. गुरू हा ज्ञानांजन घालून अज्ञानाचे अंधकार दूर करतो. म्हणून त्यांना ज्ञानसूर्य देखील म्हणतात. पराशर पुत्र व्यास यांनी घोर तपश्चर्या करून ज्ञानाचा खजीना प्राप्त करुन घेतला व त्यांनी तो जगाला लुटलाही. म्हणून त्यांना वेदांचे जनक म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. वेदांचे गुह्यज्ञान व्यासांनी प्रकट केले. व्यासांनी ज्ञानाचे पीठच निर्माण केले आणि त्यामुळे ज्या ठिकाणाहून ज्ञान दिले जाते, प्रबोधन केले जाते, त्याला व्यासपीठ म्हणण्याची प्रथा रुढ झाली. जो देतो तो गुरू अन स्विकारतो तो शिष्य. व्यासांनी आपल्याला ज्ञानाचा खजिनाच दिला आहे. त्यामुळे जीवनामध्ये कृतार्थ होण्यास मोलाची मदत होते. याकरिता त्यांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारत वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात ही व्यास पौर्णिमा साजरी होते. पौर्णिमा म्हणजे पूर्ण ज्ञानाचे भांडार. प्रत्येक साधुसंतांना गुरू परंपरा आहे. ती अगदी व्यासांपासून सुरू होवून आजपावतो असलेल्या साधुसंतांपर्यंत ही शृंखला अभेद्य आहे. म्हणून या दिवसाला प्रत्येक भक्त, शिष्यांच्या अंत:करणात वेगळे स्थान आहे. या दिवशी प्रत्येक शिष्य, भक्त, अनुयायी, चहाता आपल्या गुरुंच्या चरणकमलावर श्रीमस्तक ठेवण्यासाठी आल्याशिवाय रहात नाही. नाणीजधाम या ठिकाणी हा महोत्सव अत्यंत दिमाखदार, भक्तीमय वातावरणात श्रृतींनी सांगितल्याप्रमाणे मंगलमय आणि वेदोक्त पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक भक्त-शिष्याला आपल्या गुरूंचे पुजन करता यावे यासाठी तशी व्यवस्था केलेली असते. एकाच वेळी योग्य सुमुहूर्तावर गुरूंच्या पाद्यपूजेला सुरूवात होते. वेदसंपन्न पुरोहितांच्या नेतृत्वाखाली सर्वजण शोेडषोेपचारे पूजा करत असतात. प्रस्तुत उत्सव हा ऐन पावसाळ्यात म्हणजेच जुलै महामध्ये येत असल्याने या कालावधीत कोकणामध्ये पावसाचा जोर प्रचंड असतो. तरी सुद्धा ज्यावेळी सदगुरूंची पूजा सुरू होते त्यावेळी निसर्गही साथ देतो. भक्त-शिष्य स्नानसंध्या करुन पूजेला बसले पाहीजे असे शास्त्राचे प्रमाण आहे. त्यामुळे स्नान होण्यापूर्वी मेघराज आपल्याला स्नान घालून जे निघून जातात ते बरोबर जगद्गुरूंच्या आशिर्वादाचे मंत्र सुरू झाल्यावर आशिर्वादरुपी अक्षता मस्तकी टाकण्याकरीता पावसाचे आगमन होते. लाखो लोकांच्या श्रीमस्तकी आशिर्वादाच्या अक्षता कशा पोहोचणार याकरीता पावसाच्या रुपाने सदगुरू दोन-तीन मिनीटे अक्षता बरसतात आणि मग गुरूशक्ती काय असते याची जाणीव झाल्याखेरीज आपल्याला रहात नाही. गुरूंना परब्रम्हाची उपमा का दिली आहे? गुरूंनी संपुर्ण चराचर कसे व्यापले आहेत? त्यांचा पंचतत्वावर सुद्धा कसा अधिकार आहे? याचा अनुभव नाणीजधाम या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मिळतो. जीवनामध्ये गुरूंचा कृपाशिर्वाद मिळवून जीवनाचे कृत - कृत करण्यासाठी स्वामीजींचे सर्व भक्त या उत्सवात आलेले असतात.
-- जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव सोहळा --
अश्विन शुद्ध अष्ठमी, वार शुक्रवार रात्रौ १०.०० वा. नाणीजधाम या ठिकाणी जग उद्धारक नरेंद्राचार्यांचा जन्म झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रौत्सव संपूर्ण भारतात साजरा होत असतो. अगदी याच कालावधीत नरेंद्रचार्याचा जन्मोत्सव येत असतो. या दिवशी वैदिक सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे हा जन्मोत्सव संपन्न केला जातो. स्वत: जगदगुरूआपले उपास्य दैवत गजानन महाराज आणि सदगुरु काडसिद्धेश्वर महाराज यांची विधिवत पुजा करतात. भक्तही त्यांच्या वतीने आपल्या लाडक्या जगदगुरू माऊलीस दिर्घायुष्य लाभावे म्हणून महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन केले जाते. मंदिरातील दैनंदीन सांजारती, शेजारती, धुपारती, शेजारती कार्यक्रम संपन्न होत असतानाच पालखी सोहळा देखील संपन्न केला जातो. अनेक साधु - संत जगदगुरुश्रींचे दर्शन, आशिर्वाद घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. रात्रौ १०.०० वाजता सुहासिनी पंचारती ओवाळून अभिष्ठचिंतन करतात. साधु - संत जगदगुरुश्रींचे औक्षण करतात. संपुर्ण दिवसभर संगीताशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम उदा. गायन, नृत्य, कला इ. संपन्न होत असतात. जगदगुरुश्रींचे आशिर्वाद घेवुन या कार्यक्रमाची सांगता होते. हा उत्सव नवरात्रामध्ये येत असल्याने जवळजवळ सर्वच भक्त-शिष्यांची गैरसोय टाळण्यासाठी भक्त-शिष्यांनी जगदगुरूंना विनंती करुन २१ ऑक्टोबर या त्यांच्या जन्मदिनांकाला जन्मोत्सव आणि वर्धापनदिन असा हा उत्सव साजरा करावा अशी विनंती केली. त्यामुळे २१ ऑक्टोबर या दिवशी जन्मोत्सव सोहळा संपन्न केला जातो.
-- श्री दत्त जयंती उत्सव --
पृथ्वीतलावर पतिव्रता अनुसयेची ख्याती वाढली होती. विष्णु, ब्रम्ह आणि शिवजी यांच्या अनुक्रमे लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या भार्यांना आसुया निर्माण झाली, तिचे हरण करून जेणे करून या देवींचे स्थान त्रिभुवनामध्ये अढळ करावे. याकरिता वरिल तिन्ही देवांना तिचे सत्वहरण करण्याकरिता अतिथी स्वरूपात भुतलावर पाठवले. अनुसयेने अतिथींचे आदरातिथ्य केले, परंतू त्यांनी नग्न होवून भोजन वाढावे अशी अट घातल्याने पतिव्रता स्त्रीला ते कसे शक्य आहे? त्या महान तपस्वी अनुसयेने ओळखले हे कोणी सामान्य अतिथी नसून देव लोकीचे असामान्य विभुती असाव्यात. याचकाला अन्नदान केले नाही तर सत्व जाते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे दान केले तर पतिव्रताचा भंग होतो. यास्तव तिने आपल्या पतीचे स्मरण करून त्यांच्या कमंडलूतील पाणी या तिन्हीही अतिथींवर शिंपले. त्यामुळे तात्काळ नवजात बालकामध्ये यांचे रुपांतर झाले. अतिथीतींची मागणी तीने स्तनपान करुन पुर्ण केली. शेवटी लक्ष्मी, सावित्री, पार्वती यांना अनुसयेच्या चरणी यावे लागले. आपली चूक कबुल करावी लागली. या तिन्ही देवांनाही तिचे पतिव्रत्य श्रेष्ठ् आहे हे मानावे लागले आणि प्रसन्न होवून त्यांनी तिला वर दिला, तुझ्या पोटी आम्ही तिघेही एकरुपात जन्म घेवू. तोच हा दत्तावतार. मार्गशिष पौर्णिमा गोरस मुहूर्तावर ब्रम्ह, विष्णु, महेश यांनी स्वरुपाने जन्म घेतला. हे भगवान दत्तात्रय कलियुगामध्ये नवनाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक होते. त्यामुळे कलीयुगामध्ये जेवढे काही ज्ञान-अज्ञान संप्रदाय आहेत, यांचे गुरू-शिष्य परंपरेमुळे आद्य गुरू म्हणुन त्यांचेकडे जनकत्व जाते. आपल्या जगदगुरू नरेंद्राचार्यांची गुरूपरंपरा हि सुद्धा सदगुरू काडसिद्धांपासून भगवान दत्तात्रयांपर्यंत पोहचलेली असल्याने आपल्या पीठामार्फतही हा दत्तजयंती महोत्सव संपन्न केला जातो. आपल्या नाणीजधाम पीठाचे क्षेत्र - माऊली माहेर हा आश्रम महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात सिमुरगव्हाण या ठिकाणी आहे. या आश्रमात हा उत्सव सोहळा संपन्न होतो. कारण या आश्रमाची पीठ देवता म्हणून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. याकरिता स्वामीजींचे सर्व भक्त, शिष्य आणि स्वामीजी सिमूरगव्हाण या श्रीक्षेत्री उत्सव साजरा करतात. आपल्या या क्षेत्रापासून १२ कि.मी. अंतरावर पाथरी हे गांव आहे. ते शिर्डीच्या साईबाबांचे जन्मस्थान आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी दत्तजयंती सोहळा संपन्न होतो. सकळ सिद्धांचे आदीनाथ गुरू दत्तात्रय यांचा जन्मोत्सव साजरा करत असल्याने दोन दिवस याप्रसंगी दत्तयाग केला जातो. त्यामुळे हा उत्सव मार्गशीष चतुर्दशी आणि पौर्णिमा असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांनी संपन्न करण्याची आपल्या संप्रदायाची पद्धत आहे. आपल्या गुरूंचे काडसिद्ध गुरू, त्यांचे परात्पर गुरू भगवान दत्तात्रय यांच्यापासून आपल्यापर्यंत ते ज्ञान, तो वसा, ते आशिर्वाद आणि तो आत्मानंदाचा स्वानंद आपणास मिळावा, प्राप्त व्हावा याकरिता हा उत्सव संपन्न केला जातो. आपले वेगवेगळे आश्रम ही शक्तीपीठ आहेत, कारण या ठिकाणी त्या-त्या आश्रमाच्या पीठ देवता आणि प्रत्यक्ष स्वामीजी यांच्या शक्ती आश्रमात येणार्या भक्त, शिष्य, भाविक यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या आत्मोन्नतीसाठी उतरविलेल्या आहेत. त्यामुळे त्या-त्या उत्सवाला, त्या-त्या शक्ती, अधिक प्रभावित झालेल्या असतात. याकरिता भाविकांनी त्या-त्या उत्सवात आवर्जून सहभागी होवून गुरूकृपेचा अविष्कार प्राप्त करून घ्यावा.