JNMS,JNMS | Nanijdham - About Nanijdham Aashram
-- पीठ बद्दल माहिती --
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रमुख पीठ नाणीजधाम परशुराम भूमी, कोकण, महाराष्ट्र या क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यात श्रीक्षेत्र नाणीज या गावी आहे. भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांनी ही भूमी समुद्र ह्टवून तयार केलेली आहे. या भूमीला कोकण किंवा परशुराम भूमी असे म्हणतात. भगवान परशुराम यांचे मूळचे नाव भार्गवराम असे आहे. भगवान शंकरांनी या भार्गवरामाला ‘परशु’ नावाचे हत्यार प्रसादरुपाने दिले. ते त्यांनी धारण केल्यामुळे परशु धारण करणारा तो परशुराम असे पुढे नामाभिधान झाले. भगवान परशुराम हे ज्येष्ठ धर्नुधारी होते. त्यांचे वडील जमदग्नी यांची हत्या ‘सहस्त्रार्जुन’ या क्षत्रिय राजाने केली. या गोष्टीचा प्रचंड राग परशुरामाना आला आणि त्यांनी पृथ्वीतलावर क्षत्रिय राजा ठेवायचाच नाही असा घोर निश्चय केला. त्यांनी एकवीस वेळा पृथ्वीवर घनघोर युध्द करून पृथ्वी नि:क्षत्रिय करून टाकली आणि पृथ्वी ब्राम्हणांना दान देवून टाकली. त्यामुळे भार्गवरामाना रहाण्यासाठी, वास्तव्यासाठी भूमी हवी होती. या करीता त्यांनी आपल्या तपसामर्थ्याने तळकोकणापर्यत असणारा समुद्र हटवून कोकणभूमी निर्माण केली. या कोकण भूमीत भार्गवराम म्हणजेच परशुराम यांचे वास्तव्य आहे. अशा या पुण्यभुमीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्म झाला.
त्यांचे पूज्यपाद गुरुवर्य समर्थ सद्गुरू काडसिध्देश्वर महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी आपल्या जन्मगावी स्वस्वरूप संप्रदायाची स्थापना करून २४ फेब्रुवारी १९९२ रोजी नाथांचे माहेर या आश्रमाची स्थापना केली. स्व-स्वरुप संप्रदाय या ठिकाणी रुजला, वाढला आणि बहरलाही. या संप्रदायाचे नाणीजधाम त्यामुळे मुख्य पीठ झाले. कालांतराने या पीठाची गोवा, महाराष्ट्रातील परभणी, मुंबई इ. उपपीठे निर्माण झाली. याशिवाय नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे या ठिकाणी पीठे होवू घातलेली आहेत. या सर्व पीठांचे पिठाधिश्वर जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याचा डंका चहूकडे पोहोचत होता.
हिंदूधर्माची अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परीषद धर्माच्या उत्थानासाठी दक्षिण भारताकरीता वैष्णव पीठाची निर्मिती करू इच्छित होती. त्यांना ब्रम्हतेज आणि छात्रतेज असणारा धर्मगुरू निवडायचा होता. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याकडे वरील दोन्ही गुण असून ते संप्रदायाच्या माध्यमातून समाजाचे सक्षम नेतृत्व करीत आहेत हे ओळखून २१ ऑक्टोबर २००५ रोजी ‘अनंत श्री विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य’ या पदावर श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांना दक्षिण भारतासाठी अंलकृत करण्यात आले आणि श्रीक्षेत्र नाणीज हे जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम बनले. अर्थातच या स्व-स्वरुप संप्रदायाचे नाव बदलले आणि ‘ श्री’ संप्रदाय झाले. श्री म्हणजे मुख्य किंवा लक्ष्मी. जेवढे वैष्णव पंथीय संप्रदाय आहेत त्या सर्व संप्रदायाचे वैष्णवाचार्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज झाले आणि सर्व वैष्णव संप्रदायांचे दक्षिणेकडील मुख्य पीठ नाणीजधाम बनले.
हे पीठ रत्नागिरी जिल्ह्यात नाणीज या गावी आहे. नॅशनल हायवे क्र. १७ लगत मुंबईपासून ३५० कि.मी.अंतरावर तर गोव्यापासून २५० कि.मी. अंतरावर हे पीठ आहे. रत्नागिरी पाली या जंक्शनवरून कोल्हापूरकडे जाताना ४ कि.मी. अंतरावर तर कोल्हापूरपासून रत्नागिरीकडे येताना १०० कि.मी. अंतरावर हे पीठ आहे. नागपूर-कोल्हापूर-रत्नागिरी या नॅशनल हायवे क्र. २०४ वर हे पीठ आहे. कोकण रेल्वेने येताना रत्नागिरी या जंक्शनला उतरावे लागते. तसेच कोल्हापूर, मुंबई, गोवा इथून एस.टी.बसेसची व्यवस्था आहे.