JNMS, JNMS | Jagadgurushree - About Jagadgurushree

-- स्वामीजींचे परिचय --

"मनुष्यचर्मणा बद्ध: साक्षात्परशिव: स्वयम् | सच्छिष्यानुग्रहार्थाय गूढं पर्यटति क्षितौ | अत्रिनेत्रः शिवः साक्षादचतुर्बाहुरच्युतः | अचतुर्वदनो ब्रम्हा श्रीगुरूः कथितः प्रिये ॥ माणसाच्या कातडीत बांधलेला मानव देहधारी गुरू हा साक्षात परमशिव आहे. तो सत्शिष्यांवर अनुग्रह करण्यासाठीच पृथ्वीवर अवतरत असतो. श्रीगुरू हा त्रिनेत्र नसलेला शिव आहे. चतुर्भुज नसलेला विष्णू आहे. चतुर्मुख नसलेला ब्रम्ह आहे. गुरू हा ब्रम्ह, विष्णू आणि महेश तर आहेच, परंतु साक्षात परब्रम्ह सुध्दा आहे. गुरू या शब्दाचा अर्थ-

गुकारस्त्वन्धकारश्च, रूकारस्तेज उच्यते| अज्ञानग्रासकं ब्रम्ह गुरूरेव न संशयः| जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, तो अज्ञानाचा नाश करतो, तो सगुण ब्रम्ह म्हणजे गुरू. गुरू हा पिता, गुरू माता, गुरू हाच बंधु होय. गुरू आत्मस्वरूप आहे, गुरू आनंदमय आहे. गुरूंचे ज्ञान म्हणजे ब्रम्हज्ञान.तो चैतन्यरूप आहे. श्रीगुुरूंहून श्रेष्ठ असे काहीच नाही.

न गुरोरधिक तत्वं, न गुरोरधिक तपंः| तत्व ज्ञानतत्परं नास्ति, तस्मै श्री गुरूवे नमः॥ ब्रम्हानंदं परमसुखदं कंवलं ज्ञानमूर्ति| व्दंव्दातीतं गगन सदृश्यं तत्वमत्स्यादिलक्षम्| एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं| भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरू तं् नमामि॥ हे ब्रम्हानंद रूपी सद्गुरू, परम सुखाचा दाता, तत्वमसी महावाक्याचा अनुभव देणार्या जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज तुमचा विजय असो!

रत्नांचे आगर असलेल्या, नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, तहानभूक विसरायला लावणारा, विस्तीर्ण सागरकिनारा लाभलेल्या, रूद्र पराक्रमी, महाबली भगवान परशुरामाची भूमी असलेल्या कोकण भूमीत आंबे, फणस, काजू, नारळी, पोफळी यांचे आगर असलेल्या या रत्नागिरी जिल्हयात नाणीज गावी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा जन्म झाला.

हे नाणीज गाव तसे साधेसुधे. परंतु जगद्गुरू माऊलींच्या पदस्पर्शाने पुलंकित होवून आज संपूर्ण विश्वाला खर्या अर्थाने जागे ठेवणारे हे गाव नाणीज. ना......नीज म्हणजे जे स्वतः झोपत नाही किंवा स्वतः जागे राहून जे अब्जावधी लोकांना खर्या अर्थाने जागे रहायला शिकविते ते नाणीज.

जगद्गुरू श्रींचे मातापिता हे पूर्वजन्मीचे कोणीतरी योगभ्रष्ट तपस्वीच होते. माता सुभद्रा दत्त महाराजांच्या भक्त. पिता बाबूराव यांचे घराणे क्षत्रियकुळात सूर्यवंशी, यांचे गोत्र वशिष्ठ, आई भवानीमाता (तुळजापूर) हे यांचे कुलदैवत. पंचपल्लव व सूर्यफूल हे यांचे देवक. हे घराणे मुळातील नाशकातले निफाडचे. छत्रपती शिवरायांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक निंबाळकर यांच्या तुकडीत या घराण्याचे पूर्वज सामिल असल्यामुळे रयतेचा कानोसा घेण्यासाठी, शत्रूंच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी, गनिमांचे मनसुबे समजून घेण्यासाठी शिवरायांच्या आदेशाने ही तुकडी सतत भ्रमंती करत होती. कोकणाला लाभलेली विस्तीर्ण समुद्रपट्टी सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, रायगड, जंजिरा असे अनेक किल्ले यांची इत्थंभूत माहिती संग्रही ठेवण्याकरीता हे घराणे कोकणात उतरले.

हिंदवी स्वराज्यानंतर हे आणि अशी अनेक कुटूंबे कोकणातच स्थिरावली. नाणीज गाव संपूर्ण विश्वाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेईल असे कोणी ३०-४०वर्षापूर्वी सांगितले असते तर आपण त्यावर विश्वासच ठेवला नसता. साहजिकच आहे, अत्यंत ग्रामीण व दुर्गम भाग, याशिवाय या गावाला असे काही ऐतिहासिक, आध्यात्मिक वा धार्मिक किंवा सांस्कृतिक असा कोणताच नावाजण्यासारखा वसा नव्हता. मग एका रात्रीत हा बदल कसा झाला? हा चमत्कार कसा घडला?

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत| अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्म्यहं सृज्यामहमं| परित्राणाय साधूनाम| विनाशाय दुष्कृत्यं| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

ज्या ज्या वेळी धर्माची हानी होते, नीतिमुल्यांचा र्हास होतो, साधुसंतांना तसेच सात्विक, सज्जनांना जगणे दुरापास्त होते, त्यावेळी तो विधाता कभी राम बनके, कभी श्याम बनके तर कधी ज्ञानेश्वर माऊली बनून तर कधी स्वामी विवेकानंद बनून या भूतलावर अवतरतोच. असाच या भुतलावर आश्विन शुध्द अष्टमी, आई जगदंबेच्या नवरात्रात, जगदंबा पुत्र जो जगाचा नाथ होणार आहे, असे ज्याचे वर्णन जन्मताच पुरोहितांनी केले होते, तो ज्ञानसूर्य शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर १९६६ रोजी रात्रौ दहा वाजता क्षेत्र नाणीजधाम येथे जन्मास आला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांना पूज्य मातेमुळे दत्तभक्तीची ओढ लागली. श्रीमहाराजांचे जीवनच असे आहे, कोणतीही गोष्ट करायची किंवा अंगिकारायची तर मग ती एकदम टोकाचीच.....मग ती देवभक्ती असो किंवा अन्य काही असो. या गुणांमुळे श्रीदत्तमहाराजांना त्यांनी आपलेसे करून घेतले. अगदी बालवयात दत्तमहाराज त्यांच्याशी बोलत असत. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते| तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्|

जे अनन्यभावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेले आहेत, जे माझे निरंतर, निष्काम भावनेने चिंतन करतात, मला भजतात त्यांचा योगक्षेम मी चालवितो.

श्रीमहाराजांचे बालपण प्रतिभेचा चंद्र पौर्णिमेकडे झेपावतो तसे हळूहळू वाढत होते. लहान मुलांमध्ये असणारी खेळकर वृत्ती, हूडपणा या सर्व गोष्टी श्रीमहाराजांमध्ये होत्याच. गोपालकृष्णाने पेंदया, बोबडया, वाकडया या सर्वांना एकत्र करून जातीपातीचा काला केला होेता. स्पृश्य- अस्पृश्य याचे उच्चाटन केले होते. सांघिक शक्ती एकवटून कंसाच्या जुलूमशाहीला पायबंद घातला होता. अगदी त्याच धर्तीवर श्रीमहाराज आपल्या छोटया छोटया सवंगडयांना घेवून जातीपाती, गरीब-श्रीमंत अशी दरी भेदत होते, हे कुणाच्याच लक्षात येत नव्हते. पाचवी सहावीला असताना आपल्या गावी दत्तजयंती सार्वजनिक उत्सव सुरू केला. कोकणामध्ये होळी उत्सव फार प्रख्यात असतो. ही होळी मोठयांची असते. श्रीमहाराजांनी ती लहान मुलांची प्रथम सुरू केली. तात्पर्य, संघटक वृत्ती त्यांच्यामध्ये उपजतच आहे. आज करोडो लोकांना संघटीत केलेले आपण पहातोय. त्याची बीजे बालपणातच श्रीमहाराजांमध्ये आलेली होती. सन १९८३ ला एस.एस.सी नंतर श्रीमहाराज पुढील शिक्षणासाठी ठाणे येथे गेले. परंतु तेथे ते फार रमले नाहीत. ज्यावेळी परत गावी आले त्यावेळी पूज्य मात्यापित्यांनी ग्रामसेवक नोकरी करण्यास भाग पाडले. अध्यात्माचा ओढा असणारे महाराज संसारात, व्यवहारी जगतात रमणार नाहीत म्हणून त्यांना संसारात ओढण्यासाठी नोकरी करण्यास भाग पाडले. दि. २९ मार्च १९८५ ला नोकरीला सुरूवात झाली. ते नोकरी करत होते, परंतु चित्त अध्यात्मात होते. नरेंद्राचा नित्यनेम| स्नान संध्या अति उत्तम| तयावरी आवडी परम| निजधर्म आचारी| परंतु गृहस्थाश्रम न सांडता, गृहस्थाश्रमाच्या मर्यादा न उलंघता, देहीच विदेहता जरूर प्राप्त करून घ्यावी. परंतु वाटयाला आलेला प्रपंच, नोकरी करून हे सर्व करावे अशी पूज्य मातापित्यांची इच्छा. दत्तमहाराजांच्या आशीर्वादाने व आदेशाने श्रीमहाराज शेगावीच्या गजानन महाराजांचे भक्त झाले. दत्त महाराजांनी नरेंद्राचार्यांना सांगितले यापुढील तुझा प्रवास गजानन महाराज करतील. दत्तआज्ञा ब्रम्हआदेश समजून गजानन महाराजांचे ते केव्हाच दास बनले. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर..... गजानना तुझ्या आम्ही पायातील वहाण| याचक तुझे आम्ही दयावे समाधान॥ तुम्हापुढे देवा आम्ही घुंगुरडया समान| नेणो भावे कैसी घडे सेवा महान॥ उपाधि वचन ना ऐकती कर्ण| बहु त्रासियले आमुचे मन॥ जरी तुम्ही दिले आम्हा शाश्वत सुख| येणे नाही होणार आमुचे मन पाक॥ श्रीहरि तुम्हावीण नको हेे जीणे| आस आहे चरणाची नरेंद्र म्हणे॥

गजानन महाराजांच्या चरणाची आस दिवसागणिक वाढत जात आहे. नोकरीवरील लक्ष कमी होत असल्याचे लक्षात येताच पूज्य मात्यापित्यांनी दि. १५ ऑक्टोबर १९८५ रोजी श्रीमहाराजांचे लग्न लावून दिले. श्री. शांताराम बाबू रसाळ या मामाची मुलगी ज्यांचा जन्म दि. २ जून १९६८ रोजी झाला. त्या चि.सौ.कां. शोभना, महाराजांच्या अर्धांगिनी बनल्या. संसाराचे वेड आता तरी लागेल अशी अपेक्षा बाळगणार्या मात्यापित्यांना काय ठावूक श्री महाराजांना मुलगा झाला की ते या सर्व प्रापंचिक ॠणातून मुक्त होतील. धर्म आज्ञा मिळेल म्हणून. दि. २४ ऑक्टोबर १९८८ रोजी कानिफनाथांचा जन्म झाला. वार सोमवार, पौर्णिमा दिवस, रात्रौ ११ वाजून ४९ मिनीटांनी पुत्ररत्नाचा जन्म झाला आणि महाराज मनात आनंदले. संसार प्रपंचाच्या कटकटीतून सुटून आध्यात्मिक, पारलौकीक, आत्मिक प्रवास करण्याचा मार्ग सापडला. या खुशीत श्रीमहाराज तर मुलाच्या रूपाने संसारातील एक ओझे, एक जबाबदारी वाढली. त्यामुळे महाराज पुरते अडकले या आनंदात संपूर्ण कुटूंब. गजानन महाराजांनी श्रीमहाराजांच्या ह्दयात चाललेली आत्मिक समाधानाची झालेली घालमेल जाणून गुरू करण्यास सांंगितले. महाराजांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला यांच्यामध्ये विलक्षण काहीतरी सामर्थ्य आहे याची मनोमन जाणीव होत असे. त्यामुळे कळत नकळत आपली प्रापंचिक दुःखे महाराजांजवळ बोलताना त्यातून अगदी सहज बोलता बोलता केलेले मार्गदर्शन लोकांकरीता संजीवनी बनू लागले. आपोआपच भक्तांचा गोतावळा जमू लागला.यातून सामुदायिक भक्तीला सुरूवात झाली. महाराजांना जाणवू लागले.... ब्रम्हज्ञानाविण उपदेश| म्हणू नये खास| जैसे धान्याविण भूस| काय कामाचे॥ आता ब्रम्हज्ञानाची तगमग कुठेतरी मनाला सतावत होती. हे जाणून गजानन महाराजांनी समर्थ सिध्दयोगी काडसिध्देश्वर महाराज, कण्हेरी, कोल्हापूर यांना गुरू कर अशी आज्ञाच केली. ज्यांना तनाने, मनाने वरले आहे अशा पूज्यपाद गजानन स्वामींची वेदाज्ञा कोण मोडणार? जानेवारी १९९१ पौर्णिमा दिन या दिवशी काडसिध्देश्वर महाराजांचे भू्रत नरेंद्र महाराज झाले. श्रीमहाराज एका अभंगात म्हणतात... काडसिध्दभ्रूत नरेंद्र म्हणे| देवाची लिला कोण जाणे| या गजानन देवाची लिला कोण जाणणार? त्यांनी मला गुरू करण्यासाठी का सांगितले ते मला आता कळले. गुरूबीनु ग्यान नहीं, गुरू बीनु ध्यान नहीं| गुरू बीनु आतम विचार, न लहतु है| गुरू बीनु प्रेम नहीं, गुरू बीनु नेम नहीं| गुरू बीनु सिलहु, संतोष न गहतु है| गुरू बीनु प्यास नहीं, बुध्दी को प्रकाश नहीं| भ्रमहू को नाश नहीं, संशय रहतु है| गुरू बीनु पाठ नहीं, गौडी बीनु हाट नहीं| सुंदर प्रगट लोक, वेद यों कहत है|

समर्थ सद्गुरू काडसिध्दांच्या आत्मबोधाने प्रेरीत होवून श्रीमहाराजांनी स्वतःचा आत्मोध्दार करून घेतला. त्यावेळी महाराजांना कळले.... तन भी तेरा, मन भी तेरा, तेरा प्यंड परान| सबकुछ तेरा, तू है मेरा, यह नरेंद्र का ग्यान| आता दि. १४ फेब्रुवारी १९९२ श्रीगुरू आदेशाने नोकरीचा राजीनामा दिला आणि सरळ परमार्थाचा रस्ता अंगिकारला. आईवडील, पत्नी यांनी समर्थ सद्गुरू काडसिध्देश्वर महाराजांना साकडे घातले. आम्हाला आता कळून चुकले, नरेंद्र आता आमचा राहिलेला नाही. त्यााची पत्नी, मुलगा आणि आम्ही मातापिता यांच्यासाठी हा भक्त पुंडलिक आम्हाला आपला प्रसाद म्हणून द्यावा. अशी मागणी केल्यामुळे काडसिध्देश्वर महाराजांनी आईवडिलांच्या, पत्नीच्या विनंतीला मान देवून सांगितले, हा माझा प्रसाद तुम्हाला देतो, हा तुमच्यापाशी राहिल, अगदी तुमच्यात राहिल, परंतु कार्य मात्र माझे करेल. गुरूआज्ञा शिरसावंद्य मानून परमार्थातून प्रपंच नरेंद्राचार्यांनी सुरू केला. दि. २४ फेब्रुवारी १९९२ रोजी स्वस्वरूप संप्रदायाची स्थापना करून तुम्ही जगा, दुसर्याला जगवा हा महामंत्र जगाला प.पू. स्वामी नरेंद्राचार्यांनी दिला. गोरगरीबांबद्दल अत्यंत कनवाळू, सत्याची कास धरणारे, परोपकार वृत्ती अंगी असणारे, जनता जनार्दनाची सेवा हीच ईश्वरी सेवा मानणारे स्वामी नरेंद्राचार्यजी दूरदर्शी विचारसरणी, समाजाचा कळवळा, धर्माबद्दलची आपुलकी, क्षतीग्रस्त होत असलेला सनातन वैदिक धर्म, फार प्राचीन असलेली भारतीय संस्कृती वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, जगाला हीच प्रेरणा देणारी शक्ती आहे. याच संस्कृतीमध्ये दुसर्याला अमृत पाजण्याचे सामर्थ्य आहे, असे निक्षून सांगणारे नरेंद्राचार्यजी हा हा म्हणता सद्गुरूतून धर्मगुरूकडे केव्हा वळले ते समजले ही नाही. दि.२१ ऑक्टोबर २००५ रोजी सद्गुरू नरेंद्र महाराजांचे अयोध्यापती भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या शरयू तीराच्या काठावर वसलेल्या भुवैकुंठ अयोध्या नगरीत पटृटाभिषेक असंख्य साधुसंतांनी केला. सद्गुरू नरेंद्र महाराजांचे अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज झाले. तुमचे आमचे तर आहेतच, परंतु अखिल साधुसंतांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान भगवान प्रभू रामचंद्रांच्या रूपात आपणास जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज लाभले. त्यांचा अल्प परिचय करून देताना एवढेच म्हणू. झाले बहु होतील बहु| परंतु या सम हा| स्वामीजींची गुरूपरंपरा चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्योऽअजायता॥ मुखादिंद्रश्चाग्निश्च प्राणाव्दायुरजायत| नाभ्यां आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत| पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकां अकल्पयन॥ सर्व प्राणीमात्र प्राणामध्ये प्रवेश करतात आणि प्राणामधून निरनिराळया व्यक्ती विशिष्ट रूप धारण करतात. तैतरीय उपनिषदामध्ये प्राण म्हणजे जीवन, प्राणाबरोबरच सर्व प्राणी जन्मास येतात व तो असेपर्यंत जीवंत राहतात. म्हणून या पृथ्वीतलावर या आत्म्याचे अस्तित्व असेपर्यंत जीवाने आपल्या येण्याजाण्याचा उद्देश समजून घ्यावा. याकरीताच प्रत्यक्ष परब्रम्ह गुरूरूपाने व्यक्त होवून तुम्हाआम्हाला हा जन्ममृत्यूचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत करतात. म्हणूनच संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात म्हटले आहे. ज्यांनी गुरू नाही केला| त्याचा जन्म वाया गेला| गुरूरेकः शिवः प्रोक्त सोऽहं देवि न संशयः| गुरूतामपि देवेशि मंत्रोऽपि गुरूरूच्यते| अतो मंत्रे गुरौ देवे नहि भेदः प्रजायते॥

शिव म्हणजे ईश्वर. शिव हाच गुरू. गुरू म्हणजेच मंत्र, मंत्र म्हणजे शिव यामध्ये काही भेद नाही. इतक अनन्य साधारण महत्त्व गुरूंना आपल्या शास्त्राने दिले आहे. गुरूच आपल्यासारखा सद्गुरू, जगद्गुरू बनवू शकतात. परिस लोखंडाचे सोने करतो. परंतु परिसाचे सोने करता येत नाही. गुरूंचं तसे नसते. त्यांची कृपा शिष्यावर झाली की, तो शिष्य सुध्दा गुरू होवून जातो. या विश्वात केवळ गुरूंनाच हा अधिकार आहे. जीवाला आत्मा-परमात्म्याची ओळख पटवून देवून या भवसागरातून अत्यंत सुखरूपपणे तोच पैलतीरी घालू शकतो.

आजवर अनेक नररत्न या भूमातेच्या उदरात जन्माला आली आणि आपल्या गुरूंच्या कृपाप्रसादाने नावलौकीक मिळवून अजरामर झाली, की ज्यामध्ये अभिमानाने मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंदरनाथ, शंकराचार्य, रामानंदाचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ, साईबाबा, गजानन महाराज अशी अनेक नावे घ्यावी लागतील. वेद सांगतात आत्मा स्वरूपतः ब्रम्ह आहे. तो पंचभूतांच्या बंधनात सापडला आहे. या बंधनातून मोकळा होताच तो पूर्ववत पूर्णत्वास प्राप्त होतो. या अवस्थेचे नाव मुक्ती. मुक्ती म्हणजे पूर्णता. जन्म, मृत्यू, आधीव्याधी वगैरेंच्या कचाटयातून सुटका. ईश्वराची कृपा झाली की, आत्म्याचे हे बंधन गळून पडू शकते. हे बंधनाचे पाश तोडण्याचे सामर्थ्य केवळ सद्गुरूंमध्ये असते. म्हणून प्रत्येक जीवाने सद्गुरूंना अनन्यभावे शरण जावून आपल्या जीवाचा उध्दार करावा. या संप्रदायाचे स्थापनाचार्य अनंत विभूषीत जगद्गुरू रामानंदार्चा श्रीस्वामी नरेंद्राचार्यजी महाराज गजानन महाराजांचे निःस्सीम भक्त. नुसते भक्तच नाहीत, तर ते स्वतःला श्रीगजानन महाराज यांच्या पायातील वहाण संबोधतातच. एवढेच काय माझे सर्वस्व म्हणजे गजानन महाराज असेही मानतात. त्यांचाच अभंग पहा ना....

गजानन माझा गुरू| गजानन कल्पतरू| सौख्याचा सागरू| गजानन॥
गजानन बंधु| गजानन छंदु| जीवनाचा आनंदु| गजानन॥
गजानन वित्त| गजानन चित्त| मज साक्षिभूत| गजानन॥
गजानन ध्यानी| गजानन मनी| नरेंद्र म्हणे स्वप्नी| गजानन॥

ज्यांनी आपले सर्वस्व गजानन महाराजांना अर्प्रण केले,त्या नरेंद्राचार्यांनाही संत शिरोमणी गजानन महाराजांनी गुरू करणेबाबत आदेश दिला. १९९१ साली सिध्दगिरी पीठाचे अनभिक्षित राजराजेश्वर, कल्पद्रुम, सार्वभौम, योगीराज, श्रीमद् सद्गुरू काडसिध्देश्वर महाराज यांना गुरू केले.

गुरूंशिवाय पूर्णता नाही. दुथडी भरून वाहणार्या नदीला सागराला मिळाल्यावर जसे पूर्णत्व येते, तसे गुरू प्राप्त झाल्यावर साधकाला पूर्णत्व प्राप्त होते. स्वामीजींच्याच शब्दात ऐका.

आता काय मज काळाचे ते भय|
शेगावीच्या गजानना देखीयले|
राहो अथवा जावो नाशिवंत शरीर|
सर्व सुखे आली धावूनी समोर॥
देहाचे व्यवहार चालती अलिप्त|
सर्वकाळ आहे गण्या साक्षिभूत॥
नरेंद्र म्हणे माझा नाथ संप्रदाय|
अवघा काडसिध्द कृपामय॥

श्रीमहाराज म्हणतात, मी आता खर्या अर्थाने या भवसागरातून तरून गेलो आहे. माझ्या श्रीगुरूंच्या कृपेने मी स्थिरावलो आहे, निर्भय झालो आहे., निरिच्छ झालो आहे. एवढेच काय, सुखदुःखाचा हिमालय जरी माझ्यावर कोसळला तरी मला त्याची यत्किंचीतही पर्वा नाही. माझ्या श्रीगुरूंनी मी आणि देह या भिन्न भिन्न वस्तू भिन्न भिन्न प्रकारे जगायला शिकविल्या. स्वामी म्हणतात मी अजरामर झालो. श्रोते हो, गुरूंच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपल्यासारख्या भक्त, शिष्यांना वेद, पुराण,उपनिषदे अभ्यासण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष जागताजुगता पुरावा आणि जीवंत उदाहरण आपल्या स्वामीजींच्या सहवासातून शिकायला मिळतेे.आपण खरच महान आहोत. आपले मातापिता अत्यंत पुण्यशील होते. म्हणूनच त्यांच्या उदरी आपला जन्म झाला.अशा महान गुरूंचे शिष्यत्व लाभण्यासाठी अनेक जन्माची तपस्या काम करत असते. योग्य, सक्षम आणि पूर्ण अवतारी गुरू लाभणे अशक्यप्राय असते. आपल्याला माऊलींच्या कृपेने तो मान प्राप्त झाला. आपण खरच धन्य आहोत. आपल्या माऊलींना रामानंदाचार्य पदवीमुळे प्रभू रामचंद्रांच्या स्वरुपात मानले जाते. भगवान प्रभू रामचंद्रांनी आपल्या अवतारकार्यात धर्ममार्तंडाच्या सांगण्यावरून एका शुद्राचा वध केला होता. त्याकाळी वैदिक उपासना करण्याचा अधिकार फक्त ब्राम्हण आणि क्षत्रियांखेरीज इतरांना नव्हता. प्रभू रामचंद्रांना ते शल्य कदाचित लागून राहिले असावे म्हणून इ.स. १३०० मध्ये ते जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या रूपाने जन्माला आले. स्वतः रामानंदाचार्यांनीच तसे उद्घोषित केले आहे.

रामानंदा स्वयं राम प्रादुर्भुतो महितले|
म्हणजेच भगवान प्रभू रामचंद्र स्वतः रामानंदाचार्यांच्या रूपाने जन्म घेतात आणि आपल्या धर्मातील जातीपातींची विषवल्ली मुळापासून उपटून टाकण्यासाठी ते म्हणतात.... जातपात पूछे ना कोई| जो हरी का भजन करे|
वो हरी का होई॥

नुसते म्हणाले नाहीत तर त्यांनी संत कबीरदास, संत रविदास अशा अनेक ब्राम्हणोत्तर समाजाच्या शिष्यांचा स्विकार केला होता. त्यांनी जातीपाती हा भेद त्याकाळी मोडून काढला होता. त्यांच्यावेळी मुसलमानांचे राज्य होते. यवनांनी हिंदूचे ईस्लामीकरण सुरू केले होते. ते थांबविण्यास रामानंदाचार्यांनी फार मोठे योगदान दिले. ते अपूरे राहिलेले कार्य करण्यासाठी भगवान रामानंदाचार्य आपल्या माऊलींच्या रूपाने जन्माला आलेले आहेत.

त्यामुळे दोघांमध्ये साम्य आहे. त्यांचा आणि यांचा जन्मदिवस शुक्रवार. आवडता पदार्थ खीर. दोघांचाही गजकेशरी योग. दोघांचेही गोत्र वशिष्ट. असे अनेक साम्य असलेले भगवान नरेंद्राचार्याबद्दल अनेक वेळा आखाडा परिषदेचे साधू म्हणतात......

राम स्वयं रामानंदाचार्य, रामानंदाचार्य स्वयं नरेंद्राचार्य|प्रादुर्भुतो महितले|

या सुभाषिताचा अर्थ असा - स्वत: राम रामानंदाचार्य रुपात आणि रामानंदाचार्य या पृथ्वीतलावर नरेंद्राचार्यांच्या रूपात जन्म घेतला आहे. त्यामुळे हिंदू धर्म सावरण्याचे काम त्यांच्यावर अखिल भारतीय आखाडा परिषदेने सोपविले आहे. प्रत्यक्ष भगवान तुम्हाआम्हाला गुरूरूपात लाभले. आपले अहोभाग्य किती महान आहे!

अशा या तेजस्वी गुरूंची गुरूपरंपरा किती महान आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. कलियुगाच्या प्रारंभी भगवान विष्णूंनी नवनारायणांना पाचारण करून या युगाचा प्रारंभ कसा होईल आणि तुम्ही कोठे,कुठे जन्म घ्यावा, काय अवतारकार्य करावे याची सांगोपांग माहिती दिली. त्यामुळे कवि नारायण माशाच्या पोटी जन्म घेवून मच्छिंद्रनाथ नावाने प्रगट झाले. त्यांनी भगवान दत्तात्रय गुरू केले. हरी नारायणाने उकीरडयात जन्म घेवून गुरू मच्छिंद्रनाथ साधूंच्या आशीर्वादाने गोरक्षनाथ नाव मिरविले. अंतरिक्ष नारायण यज्ञकुंडातून प्रगट होवून राजा गोपीचंदाचे गुरू जालिंदरनाथ म्हणून उदयास आले.त्यांना दत्तात्रयांना शरण जावे लागले. प्रबुध्द नारायण हत्तीच्या कानातून जन्मले आणि कानिफनाथ नावाने जालंदरांना शरण गेले. पिपला नारायण कुशबेटात जन्मले आणि चर्पटीनाथ नाव धारण केले. अर्विहोत्र नारायण अंडयातून प्रगटले, नागेशनाथ नावाने प्रसिध्द झाले.

द्रुमिल नारायण भिक्षापात्रातून प्रगट होवून भर्तरीनाथ या नावाने प्रसिध्द झाले तर चमस नारायण रेवा नदीच्या किनारी जन्मास आले आणि रेवणसिध्दनाथ नावाने प्रसिध्द झाले. चर्पटी, नागेश, भर्तरी, रेवणसिध्दनाथ हे चौघेही दत्तात्रयांचे शिष्य तर करभंजन नारायण मातीच्या पुतळयातून जन्माला आले आणि गहिनीनाथ नावाने गोरक्षनाथांचे शिष्य झाले. पुढे मच्छिंद्रनाथांचे नऊ, गोरक्षांचे आठ, जालंदरचे आठ, कानिफाचे नऊ, चर्पटीनाथांचे नऊ, नागेशनाथांचे सहा, भर्तरीनाथांचे नऊ, रेवणसिध्दांचे आठ आणि गहिनीनाथांचे सहा, मच्छिंद्रनाथांचे पुत्र मीननाथ यांचे सहा, जालंदरनाथांचे पुत्र धर्मनाथ यांचे सहा अधिकारी शिष्य होते म्हणजे नऊ नाथांचे एकूण ८४ शिष्य आणि नऊ नाथ यांचा मिळून नाथपंथ संप्रदाय उदयास आला.

याच नाथसंप्रदायातून आपल्या संप्रदायाचा उगम होतो. रेवा नदीच्या किनारी जन्म घेतलेले चमस नारायण रेवणसिध्दनाथ या नावाने प्रसिध्द झाले. ते भगवान दत्तात्रयांचे शिष्य होते. या रेवणसिध्दनाथांचे कास्तसिध्द शिष्यांपासून हिंचगिरी आणि चिम्मड संप्रदाय सुरू होतो. कास्तसिध्दांचे अनेक शिष्य होवून गेले. त्या सर्वांची नावे कास्तसिध्द अशी होती. त्यापैकी शेवटच्या कास्तसिध्दांकडून गुरूलिंग जंगम महाराजांनी दिक्षा घेतली. हे गुरूलिंग जंगम महाराज कर्नाटकातील निबंरगी या ठिकाणचे.यांचे शिष्य रघुनाथप्रिय महाराज पंजाब तंजावरचे. या रघुनाथप्रिय महाराजांचा अनुग्रह कर्नाटक राज्यातील हिंचगिरीचे भाऊसाहेब महाराज उमदीकर यांनी घेतला. या भाऊसाहेबांचे एकूण अधिकारी शिष्य १० होते.त्यापैकी सिध्दरामेश्वर महाराज, सोलापूर यांचे शिष्य मुपीन काडसिध्देश्वर म्हणजेच कण्हेरी, कोल्हापूर हेच आपल्या माऊलींचे गुरूवर्य होत. मुपीन काडसिद्धेश्वर महाराज लिंगायत धर्माचे २६ वे मठाधिपती होतेच. परंतु त्यांनी आत्मज्ञान मिळविण्याकरीता सिध्दरामेश्वर महाराजांचा अनुग्रह घेवून सनाथ झाले. त्यांच्याही कृतीतून आपण शिकले पाहिजे. ते स्वतः लिंगायत समाजाचे धर्मगुरु होते. अमरकोष नावाचा कठीण ग्रंथ कंठस्त होता. परंतु हे सर्व जरी असले तरी आत्मज्ञानाविना वैभव, सत्ता,अधिकार शून्य आहेत, हे बाप्पांनी जाणून हिंदूधर्मातील मराठा समाजातील सिद्धरामेश्वर गुरुंना शरणा गेले. म्हणजेच काय गुरुंशिवाय मुक्ती नाही, गुरुंशिवाय भक्ती नाही, गुरुंशिवाय देव नाही,गुरुंशिवाय जीव नाही. सर्वत्र गुरु,गुरु,गुरुच आहेत.

ब्रम्हानंदं परमसुखदम् केवल ज्ञानमूर्ती|
द्वद्वातीतं गगनसदृश्यं तत्वमत्स्यादिलक्ष्यम|
एकमं नित्यं विमल मचलं सर्वधिसाक्षिभूतं|
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त नमामि|

ब्रम्हानंदी आनंदमय भरुन उरलेले प्रत्यक्ष ज्ञानमूर्ति, आकाशाप्रमाणे चराचर व्याप्त केवळ एक आणि एकच, नित्य,आनंदविभोर करणारे सर्वसाक्षी त्रिगुणविरहीत असणारे सद्गुरु म्हणजे परब्रम्हच होय. अशा परब्रम्हाची भेट जीवाला साताजन्मीचे पुण्य गाठी असल्याशिवाय होत नाही. आपली माऊली रत्नांची खाण असलेली गुरुपरंपरेतील आहे. या हिंचगिरी संप्रदायात एकापेक्षा एक सद्गुरु रत्न उदयास आली. त्या कुळातील आपली सद्गुरु माऊली आहे. अशा प्रकारची गुरुपरंपरा मिळण्यासाठी तुकोबारायांच्या भाषेत सांगायचे झाले

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले|
म्हणूनी विठ्ठले कृपा केली॥

अनेक जन्माचे पुण्य असल्याखेरीज अशी उज्वल गुरुपरंपरा असणारी रत्नांची खाण सापडत नाही. माऊली खचितच भाग्यवान आहेत. परंतु ते ईश्वरी अवतार सुद्धा आहेत.म्हणून त्यांना वैष्णवांचे आचार्य बनण्याचा मान वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मिळाला. आचार्य म्हणजे गुरु. आपली इथून तिथून तमाम जनतेची गुरुमाऊली झाली आहे. रामानंदाचार्य या पदाचा मान

सितानाथ समारंभा| रामानंदाच मध्यमा|
नरेंद्राचार्य पर्यंताय| वंदे गुरुपरंपरा॥

म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांपासून सुरु झालेली ही परंपरा आपल्या गुरुमाऊलींपर्यंत येवून पोहोचते.

प्रत्येक धर्मात धर्मगुरु ही सर्वात सर्वोत्तम पदवी आहे. या पदवीनंतर प्रत्यक्षात भगवंतच या धर्माचा शिरोमणी असतो. बुद्ध धर्माचे आराध्य दैवत भगवान गौतमबुद्ध. बौद्ध धर्माचे धर्मगुरु दलाई लामा. मुस्लीम धर्माचे आराध्यदैवत अल्ला तर धर्मगुरु महमद पैगंबर.ईसाई धर्माचे आराध्यदैवत येशू आणि धर्मगुरु पोप. तसेच आपल्या हिंदूधर्माचे आराध्यदैवत भगवान विष्णू किंवा राम. आपले धर्मगुरु रामानंदाचार्य किंवा शैवांचे आराध्यदैवत भगवान भोलेनाथ तर धर्मगुरु शंकराचार्य.

किती महान आपण आहोत! प्रत्यक्ष परब्रम्हाचा साक्षात अवतार भगवान रामानंदाचार्य आपली गुरुमाऊली आहे. अशा महान विभूतीचे आपण शिष्य आहोत ही कल्पनाच फार सांगून जाते.आपले गुरु म्हणजे प्रत्यक्ष भगवानच. या भगवंताचा आपल्याला वशिला असेल तर आपल्या जीवनात काहीच न्यून पडणार नाही. साक्षात वेदमूर्ती ज्ञानेश्वर माऊली म्हणातात,

सद्गुरुसारीखा असता पाठीराखा|
इतरांचा लेखा कोण करी॥
राजयाची कांता काय भीक मागे|
मनाचिया जोगे सिद्ध पावे॥
कल्पतरु तळवंटी जो कोणी बैसला|
काय उणे त्याला सांगे जो जी|
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |
आता उद्धरीलो सद्गुरुकृपे॥

ज्ञानियांचा राजा, परब्रम्ह भगवान विष्णूंचा अवतार, जडमूढांचा उद्धारकर्ता, हिंदवी स्वराज्याचा प्रेरणास्त्रोत ज्याच्या कृपेमुळे वारकरी धारकरी झाला आणि प्रत्यक्ष रुद्राचा अवतार राजा शिव छत्रपतीला हिंदवी स्वराज्यात अप्रत्यक्षपणे मदत केली असा धुरंदर दुरोगामी दृष्टीचा दृष्टा, कल्पतरु ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी सद्गुरु कृपेमुळेच उद्धारलो आहे. वास्तविक ज्ञानेश्वर माउलींनी अनेक जडमूढांचा उद्धार केला. १४०० वर्षे असणार्या तपस्वी चांगदेवाला ६५ ओव्यांचा बोध करुन देहबुद्धी क्षीण करायला लावली. ज्ञानेश्वर माउलींच्या पाठीवर भाजलेल्या मांडयावर ज्यांनी कावळयाप्रमाणे झडप घातली ते विसोबा ज्ञानेश्वर माऊलींमुळे गुरुपदाला पोहोचले आणि नामदेवांचे गुरु होवून भागवत सांप्रदायाचा झेंडा त्रिभुवनी फडकविला. असे सामर्थ्य असणारे ज्ञानेश्वर महाराज गुरुंची थोरवी गातात

यातच गुरुंच्या शक्तीची, सामर्थ्याची, कृपेची साक्ष दडलेली आहे. गुरुंना कल्पतरु म्हटले आहे, आपण कल्पतरु नरेंद्राचार्य तरुची फळे आहोत. मग आपण किती भाग्यवान आहोत? असे गुरु प्राप्त होणे तुकोबारायांच्या भाषेत सांगायचे झाले तर पाहिजे जातीचे| वेडया गबाळयाचे काम नाही|

त्याचबरोबर त्यांना वैष्णव पंथीय जगद्गुरु उत्तराधिकारी परंपरा असल्यामुळे ती ही या ठिकाणी देत आहोत.आद्य रामानंदाचार्याचे उत्तराधिकारी म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सनातन हिंदू धर्माचे नेतृत्व करत आहेत. जगद्गुरू रामनरेशाचार्यजी महाराज-वाराणसी, जगद्गुरू रामभद्राचार्यजी महाराज-चित्रकुट आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज - नाणीजधाम, जगद्गुरु हंसदेवाचार्यजी महाराज - हरीद्वार हे सांप्रत काळात वैष्णव संप्रदायाचे चार जगद्गुरू आहेत.