श्री रामनवमी उत्सव

हिंदू धर्मामध्ये चैत्र प्रतिपदेपासून नवीन वर्षाला सुरूवात होते. वृक्षांची जुनी पाने गळून चैत्राची नवीन पालवी फुटू लागते. वसंत ऋतूचे नुकतेच आगमन झालेले असते. कोकीळेला कंठ फुटून अत्यंत मधुर आवाजाने निसर्ग बहरुन येतो. निंबोळ्याचे सडे कडूनिंबाच्या वृक्षाखाली जणू काही कुणी घातलेलेच आहेत असे वाटू लागते. झाडा-झुडूपांना आलेली पालवी धरतीमातेची कास झळाळून टाकतात. वातावरणामध्ये तारुण्याने मुसमुसलेले, सळसळते चैतन्य निर्माण होते. अशा मंगलमय वातावरणामध्ये चैत्र शुद्ध नवमीच्या शुभमुहूर्तावर देवतांची दैत्यांच्या कचाट्यातुन सुटका करण्यासाठी भगवान विष्णू मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये रघुकूळात अयोध्या या ठिकाणी जन्म घेतात. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. संपूर्ण भारतवासीय हा दिवस स्मरणात ठेवतात. आदर्श पितृभक्त, आदर्श बंधु, आदर्श देव, आदर्श पती आणि आदर्श राजा म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांची ख्याती आहे. एक वचनी, एक वाणी आणि एक पत्नी असे व्रत अंगी असलेल्या भगवान रामचंद्रांचा हा जन्म दिवस. नाणीजधाम या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांचे टुमदार व सुंदर असे मंदीर असल्याने नाणीजधाम या ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो. हिंदूधर्मामध्ये आलेली उदासीनता आणि हिंदूधर्मावर झालेली आक्रमणे यामुळे खिळखिळा झालेला हिंदूधर्म पुन्हा चैतन्यमय करण्याकरिता आणि गतवैभव मिळवून देण्याकरीता स्वत: प्रभु रामचंद्रांनी आद्य जगदगुरू रामानंदाचार्य यांच्या रूपाने अवतार घेतला. अनंतानंद, सुखानंद, सुरासुरानंद, नरहरियानंद, योगानंद (ब्राम्हण), पिपा (क्षत्रिय), संत कबीर (जुलाहा), सेना (न्हावी), धन्ना (जाट), रविदास (चांभार), पद्मावती, सुरसरी (स्त्रिया) अशा द्वादश अधिकारी शिष्याकरवी स्वत: हिंदू धर्माची पताका मोठया डौलाने फडकत ठेवण्याचे कार्य आद्य जगदगुरू रामानंदाचार्यांनी केले. शैव वैष्णवांमधील कटुता दूर करून द्वैत-अद्वैतांचा वाद नाहीसा केला आणि हिंदूधर्मात ऐक्य पुन्हा निर्माण करून हिंदूधर्माला संजीवनी देण्याचे काम आद्य जगदगुरू रामानंदाचार्यानी केले. ते एकूण १२७ वर्षे राहीले. या कालावधीत हिंदू धर्मासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी स्पृश्य-अस्पृश्यता नाहीशी केली. जाती भेद विसरून सर्व हिंदू धर्मीय एक आहेत, याची शिकवण दिली. जगदगुरूं रामानंदाचार्य म्हणायचे ‘रामानन्द: स्वयं राम: प्रादुर्भूतो महीतले’ या आद्य जगदगुरू रामानंदाचार्यांचे उत्त्ारािधकारी म्हणून दक्षिणेकडील विद्यमान जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज असल्याने नाणीजधाम या ठिकाणी हा राम नवमीचा उत्सव तितक्याच आत्मियतेने आणि भक्तीरसात न्हावून निघाल्याप्रमाणे संपन्न होतो. हे पीठ धर्मपीठ असल्याने या ठिकाणी होणारे सर्व उत्सव अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विधीवत साजरे होतात, त्यामुळे याची फलप्राप्ती या उत्सवात सहभागी होणार्या प्रत्येक भाविकास प्राप्त होते.