जनजागृती उपक्रम

अ) समाजाशी निगडीत असणार्या वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधनांच्या माध्यमातून व्यापक जनजागरण केले जाते. भारतातील अनेक राज्यांमध्ये हे प्रबोधनांचे कार्यक्रम घडवून आणले जातात. वर्षातून किमान २०० जिल्ह्यांना हे कार्यक्रम केले जातात. असे कार्यक्रम अनेक वर्षापासून चालू आहेत.

आ) भारतातील अनेक खेड्यांमध्ये मन:शांती केंद्रे (सेवाकेंद्रे) सुरु असून या केंद्रामार्फत दर आठवड्याला संतसंगाच्या माध्यमातून मन:शांती संवर्धित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

इ) अंधश्रद्धा निर्मूलन-या उपक्रमांतर्गत आतापर्यंत कोट्यावधी लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्यात आले आहे. १९८९ सालापासून या उपक्रमावर कार्य केले जात आहे. अध्यात्मिक प्रबोधनाद्वारे जनजागरण करुन अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांना अध्यात्म, विज्ञान व व्यवहार यांची सांगड घालून कसे जगावे हे शिकविले जात आहे.

ई) व्यसनमुक्ती- या उपक्रमांतर्गत १९८९ सालापासून कार्य सुरु आहे. सुमारे दोन लाख व्यक्तींना दारुच्या व्यसनापासून दूर करण्यात आलेले आहे. प्रबोधनाच्याद्वारे विनामूल्य व्यसनमुक्ती मार्गदर्शन केले जात आहे.

उ) हुंडानिर्मूलन- हुंडा देणार नाही, घेणार नाही अशाप्रकारचे जनजागरण व्यापक प्रमाणात करुन हुंडा निर्मूलनाच्या कार्यात सक्रीय सहभाग संस्थानाने नोंदवलेला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत अनेक सामुदायिक विवाह सोहळे संस्थानतर्फे घेण्यात आलेले आहेत.

दुर्बल घटक मदत उपक्रम-

अ) शिलाई मशिन- या उपक्रमांतर्गत गोरगरीब, निराधार महिलांना शिलाई मशिनचे विनामूल्य वाटप करण्यात येते. आतापर्यंत ७२०५ शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले आहे.

आ) घरघंटी वाटप- दुर्बल घटक मदत उपक्रमांतर्गत ज.न.म. संस्थान दरवर्षी विनामूल्य घरघंट्यांचे वाटप करते. समाजातील गोरगरीब कुटूंबांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त व्हावे याकरता हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २५०० दरम्याने घरघंट्या वाटप झालेल्या आहेत.

इ) दुभत्या गाई, म्हशी वाटप- गरीब, गरजू कुटूंबांना पस्तीस ते चाळीस हजार किंमतीची गाय किंवा पासष्ट ते सत्तर हजार किंमतीची दुभती म्हैस विनामूल्य दिली जाते. तिचे दूध विकून त्या कुटूंबाने आपला उदरनिर्वाह करावा, या हेतूने दुभत्या गाई तसेच म्हशी दिल्या जातात. आतापर्यंत अशा वाटप केलेल्या गाईंची व म्हशींची संख्या १००० ते १५०० आहे.

ई) शेळ्या, मेंढ्या वाटप- गरीब, अल्प भूधारक शेतकर्यांना उत्पन्नाचे साधन म्हणून शेळ्या, मेंढ्या यांचे दरवर्षी विनामूल्य वाटप केले जाते. आतापर्यंत ३००० ते ४००० शेळ्या, मेंढ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे.

उ) पिठाची चक्की, माशांची जाळी, एस.टी.डी. बूथ वाटप - दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी पिठाची चक्की घालून देण्यात येते. आतापर्यंत २० ते २५ पिठाच्या चक्क्या घालून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मच्छिमार बांधवांना माशांची जाळी, अंध, अपंगांना एस.टी.डी. बूथ घालून देण्यात आलेले आहेत.

सामाजिक सोई सुविधा-

ज.न.म. संस्थानाच्या सर्व पीठांवर भक्तनिवास, धर्मशाळा व महाप्रसादालयाची सोय उभारण्याचे काम सुरु आहे. काही पीठांवर या सर्व सोई झालेल्या आहेत.

सर्व पीठांवर येणार्या भाविकांना दोन्ही वेळचा महाप्रसाद विनामूल्य दिला जातो. आतापर्यंत काही लाखो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे.

पीठांवर येणार्या भाविकांसाठी सार्वजनिक बाथरुम, शौचालये, मुतार्या, प्रशस्त मैदाने संस्थानाने निर्माण केली आहेत.

पर्यावरणाचे संरक्षण, संतुलन व संवर्धन- या उपक्रमांतर्गत पाणी अडवा, पाणी जिरवा करीता महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात ज.न.म. संस्थानाच्या वतीने कच्चे वनराई बंधारे दरवर्षी बांधण्यात येतात आणि पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवण्याचे काम केले जाते. आतापर्यंत सुमारे १५०० ते २००० बंधारे बांधण्यात आलेले आहेत.

दरवर्षी सेवाकेंद्रांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. आतापर्यंत काही लाख वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच संप्रदायातर्फे ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम केले जाते. दरवर्षी हजारो गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते.

सामाजिक ऋणानुबंध-

अ) समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणार्या मान्यवरांचे आदरातिथ्य करुन त्यांना विशेष पदवी देवून गौरविले जाते. भारतरत्न, गानकोकीळा श्रीमती लता मंगेशकर यांना महामहीम उपराष्ट्रपती भैरवतसिंह शेखावत यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देवून ज.न.म. संस्थानाने त्यांचा सन्मान केला आहे.

भारतीय इतिहासाचार्य श्रीमान बाबासाहेब पुरंदरे यांनाही जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.

आ) गरीब, गरजू व्यक्तींचे विवाह विनामूल्य संस्थानातर्फे करुन दिले जातात.

इ) बेवारस मृत व्यक्तींचे अंतिम संस्कारासाठी येणारा खर्च संस्थानातर्फे दिला जातो.

ई) धर्मांतर झालेल्या व्यक्तींना पुन:श्च आपल्या स्वधर्मात यायचे असल्यास शास्त्रानुसार त्याला विधीवत पुनर्स्थापित केले जाते. आतापर्यंत दिड लाखाहून अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे.