गुरूपौर्णिमा उत्सव

संत श्रेष्ठ नामदेव महाराज असे म्हणतात, ‘ज्यांनी गुरू नाही केला, त्याचा जन्म वाया गेला. त्या रामकृष्णादी भगवंतांनीही त्या-त्या अवतारात गुरूंचे चरण घट्ट धरले आहे. परमात्मा व जीवात्मा यांच्यामधील दुवा म्हणजे सद्गुरू होय. गुरू हा ज्ञानांजन घालून अज्ञानाचे अंधकार दूर करतो. म्हणून त्यांना ज्ञानसूर्य देखील म्हणतात. पराशर पुत्र व्यास यांनी घोर तपश्चर्या करून ज्ञानाचा खजीना प्राप्त करुन घेतला व त्यांनी तो जगाला लुटलाही. म्हणून त्यांना वेदांचे जनक म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. वेदांचे गुह्यज्ञान व्यासांनी प्रकट केले. व्यासांनी ज्ञानाचे पीठच निर्माण केले आणि त्यामुळे ज्या ठिकाणाहून ज्ञान दिले जाते, प्रबोधन केले जाते, त्याला व्यासपीठ म्हणण्याची प्रथा रुढ झाली. जो देतो तो गुरू अन स्विकारतो तो शिष्य. व्यासांनी आपल्याला ज्ञानाचा खजिनाच दिला आहे. त्यामुळे जीवनामध्ये कृतार्थ होण्यास मोलाची मदत होते. याकरिता त्यांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारत वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात ही व्यास पौर्णिमा साजरी होते. पौर्णिमा म्हणजे पूर्ण ज्ञानाचे भांडार. प्रत्येक साधुसंतांना गुरू परंपरा आहे. ती अगदी व्यासांपासून सुरू होवून आजपावतो असलेल्या साधुसंतांपर्यंत ही शृंखला अभेद्य आहे. म्हणून या दिवसाला प्रत्येक भक्त, शिष्यांच्या अंत:करणात वेगळे स्थान आहे. या दिवशी प्रत्येक शिष्य, भक्त, अनुयायी, चहाता आपल्या गुरुंच्या चरणकमलावर श्रीमस्तक ठेवण्यासाठी आल्याशिवाय रहात नाही. नाणीजधाम या ठिकाणी हा महोत्सव अत्यंत दिमाखदार, भक्तीमय वातावरणात श्रृतींनी सांगितल्याप्रमाणे मंगलमय आणि वेदोक्त पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक भक्त-शिष्याला आपल्या गुरूंचे पुजन करता यावे यासाठी तशी व्यवस्था केलेली असते. एकाच वेळी योग्य सुमुहूर्तावर गुरूंच्या पाद्यपूजेला सुरूवात होते. वेदसंपन्न पुरोहितांच्या नेतृत्वाखाली सर्वजण शोेडषोेपचारे पूजा करत असतात. प्रस्तुत उत्सव हा ऐन पावसाळ्यात म्हणजेच जुलै महामध्ये येत असल्याने या कालावधीत कोकणामध्ये पावसाचा जोर प्रचंड असतो. तरी सुद्धा ज्यावेळी सद्गुरूंची पूजा सुरू होते त्यावेळी निसर्गही साथ देतो. भक्त-शिष्य स्नानसंध्या करुन पूजेला बसले पाहीजे असे शास्त्राचे प्रमाण आहे. त्यामुळे स्नान होण्यापूर्वी मेघराज आपल्याला स्नान घालून जे निघून जातात ते बरोबर जगद्गुरूंच्या आशिर्वादाचे मंत्र सुरू झाल्यावर आशिर्वादरुपी अक्षता मस्तकी टाकण्याकरीता पावसाचे आगमन होते. लाखो लोकांच्या श्रीमस्तकी आशिर्वादाच्या अक्षता कशा पोहोचणार याकरीता पावसाच्या रुपाने सद्गुरु दोन-तीन मिनीटे अक्षता बरसतात आणि मग गुरूशक्ती काय असते याची जाणीव झाल्याखेरीज आपल्याला रहात नाही. गुरूंना परब्रम्हाची उपमा का दिली आहे? गुरूंनी संपुर्ण चराचर कसे व्यापले आहेत? त्यांचा पंचतत्वावर सुद्धा कसा अधिकार आहे? याचा अनुभव नाणीजधाम या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मिळतो. जीवनामध्ये गुरूंचा कृपाशिर्वाद मिळवून जिवनाचे कृत - कृत करण्यासाठी स्वामीजींचे सर्व भक्त या उत्सवात आलेले असतात.

फोटो विभाग