संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन

संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जयंती उत्सव
जगदगुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम या पीठामध्ये गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगदगुरू रामानंदाचार्य जयंती असा माघ वद्य षष्ठी ते सप्तमी असा उत्सव सोहळा संपन्न होत असतो. संतश्रेष्ठ गजानन महाराज हे जगदगुरूं रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे उपास्य दैवत. संतशिरोमणी गजानन महाराज सन १८७८ माद्य वद्य सप्तमी शके .... या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या गावी पातूरकरांच्या कार्यक्रमप्रसंगी प्रथम दिसले. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. पूज्य श्री गजानन महाराज यांचे सर्व भक्त प्रकटदिन हा सोहळा मोठ्या उत्साहाने, भक्तीभावाने संपन्न करतात. जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांनी नाणीज पीठाची पीठदेवता म्हणून संत शिरोमणी गजानन महाराजांची स्थापना केलेली असल्याने नाणीजधाम या ठिकाणी हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. प. पू. नरेंद्राचार्य स्वामीजी ज्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचे उत्तराधिकारी म्हणून प्रतिष्ठीत आहेत, त्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा जन्म माघ वद्य सप्तमी सन १३०० मध्ये झाला. त्यामुळे माघ वद्य सप्तमी या दिवशी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य जयंती साजरी केली जाते. या दोन्हीही विभुतींचा जन्मोत्सव माघ महिन्यामध्ये कृष्ण षष्ठीपासून अष्टमीपर्यंत नाणीजधाम या ठिकाणी संपन्न होतो. या निमित्ताने जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त, शिष्य आणि संपूर्ण स्व-स्वरुप संप्रदायाचा परिवार या कार्यक्रमाला उपस्थित असतो. नाथांचा माहेर हा स्वामीजींचा मूळ आश्रम आहे. या आश्रमातून श्री गजानन महाराज आणि आद्य जगदगुरू रामानंदाचार्य यांची पालखी हत्ती, घोडे तसेच दिंड्या-पताकांच्या जयघोषात नवीन आश्रमी येते. संपूर्ण भारतातील अनेक साधु-संत या कार्यक्रमाला उपस्थित असतात. पूर्णत: तिनही दिवस अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतीक वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो. या सोहळ्यात आपल्या संस्कृतीचे विहंगम दृष्य आपणास अनुभवण्यास मिळते. श्रद्धा, भक्ती, समरसता, द्वैत-अद्वैत यांच्या पलीकडे पोहचलेला प्रचंड जनसमुदाय मन:शांती, आनंद याची लयलूट करताना पाहीला की अत्यंत समाधान वाटते. अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक आणि मन:शांती, आरोग्य या सर्व गोष्टींचा सुंदर मिलाप या कार्यक्रमात पहावयास मिळतो.

संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन वारी उत्सव बातमी पत्रक-२०१५
बातमी पत्रक २०१४
संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन वारी उत्सव -२०१४