जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची माहिती

व्हीजन-सर्व प्राणीमात्रांच्या स्थैर्याकरीता, उन्नतीकरीता, शांतीकरीता सतत सेवाकार्यात कार्यशील राहणे. सदरची सेवा एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून अखंड मानवतेसाठी असावा.

मिशन- भारतातील दुर्गमातील दुर्गम खेड्यापाड्यांपासून अगदी शहरी भागातील गरीब, गरजू, दीनदुबळया लोकांची तसेच पाळीव प्राण्यांची विनाशुल्क वेगवेगळ्या प्रकारची सेवा अखंडीतपणे सुरु असावा.

इतिहास- अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी १९८९ साली संत शिरोमणी गजानन महाराज (शेगाव) यांच्या आदेशाने प्रपंचात राहून परमार्थिक कार्याला सुरुवात केली. समाजातील तरुण वर्गामध्ये असलेली दुर्व्यसने (उदा. दारु, गांजा, चरस इ.) समाजाला घातक आहेत. व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या अनेक तरुणांना व्यसनमुक्त करण्याचा प्रबोधनाच्या माध्यमातून सपाटा सुरु केला. त्याचबरोबर गरीबीने गांजलेल्या आणि शिक्षणाच्या बाबतीत अशिक्षित असलेला समाज अंधश्रद्धांचा बळी ठरत आहे हे पाहून त्यांना व्यापक समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे हे जाणून अध्यात्मातून विज्ञानाकडे घेवून जाण्याकरीता मोठी व्यापक चळवळ हाती घेतली.

त्याकरीता एफ. ९९५/……..नंबरने रजिस्ट्रेशन करुन संस्थेची निर्मिती केली. या कार्याचा व्याप संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात वाढू लागला. त्यामुळे नोकरी करणे अशक्य झाले. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज, कण्हेरी (कोल्हापूर) या गुरुवर्यांच्या आदेशाने नोकरीचा राजीनामा देवून २४ फेब्रुवारी १९९२ रोजी पूर्णत: अध्यात्मिक मार्गात स्वत:ला झोकून घेतले. ‘अध्यात्मिक मार्गातून समाजाची सेवा’ हेच ब्रिदवाक्य उराशी बाळगून कार्याला सुरुवात झालेली असल्यामुळे समाजकार्य फारच व्यापक होवू लागले. या संस्थेचेे कार्यक्षेत्र मर्यादीत असल्यामुळे कार्याची व्यापकता वाढविण्यात अडचणी येवू लागल्या.

त्यामुळे दि. १३/४/१९९४ रोजी मा.धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये ई/६९४/१३/४/१९९४ नंबरने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची निर्मिती झाली. या संस्थानाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश असून या संस्थानातर्फे शिक्षण, आरोग्य, आपत्कालीन मदत, कृषी, प्राणीमात्रांचे संगोपन, दुर्बल घटकांचे लालन-पालन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडा निर्मूलन, पर्यावरणाचे संरक्षण -संतुलन व संवर्धन, सामाजिक ऋणानुबंध, धार्मिक-अध्यात्मिक जनजागरण, ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तु, स्थळे, स्मारकांचे जतन इ. उपक्रम ही संस्था राबवत आहे. भारतातील १८ ते २० राज्यांमध्ये या संस्थानाचे सेवाकार्य जोमाने सुरु आहे.